नळीची भाजी

शास्त्रीय नाव – आयपोमिया ऍक्वेटिका (Ipomoea aquatica)
कुळ – कोन्वॉलव्हिलेसिई (Convolvulaceae)
इंग्रजी – वॉटर स्पिनॅच (water spinach)
स्थानिक नावे – नाळ, नळी
नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. नळीची भाजी ही वर्षायु किंवा द्विवर्षायु वेलवर्गीय वनस्पती आहे.

औषधी गुणधर्म

  • ही वनस्पती दुग्धवर्धक व कृमीनाशक गुणधर्माची आहे.
  • पांढरे डाग, कुष्ठरोग, पित्तप्रकोप आणि तापात ही वनस्पती उपयुक्त आहे, तसेच कफ व वातवर्धक आहे.
  • कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.
  • स्त्रियांना मानसिक आणि सामान्य दुर्बलता आलेली असल्यास ही वनस्पती शक्तीवर्धक म्हणून देण्याची प्रथा आहे.
  • सुकविलेला अंगरस जुलाब झाल्यास देतात.
  • नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते.

नळीची भाजी

साहित्य
नळीची भाजीची पाने देठासहित व कोळी खोडे, कांदा, लसूण, बटाटा, तेल, मीठ, हळद, हिरवी मिरची इ.

कृती

  • भाजी स्वच्छ धुऊन घ्यावी. भाजीची पाने चिरून घ्यावीत.
  • पानांचे देठ व कोवळी खोडे यांचे छोटे व लांब तुकडे करावेत.
  • कुकरमध्ये भाजी वाफवून घ्यावी.कांदा बारीक चिरावा.
  • बटाट्याचे गोलाकार पातळ तुकडे (वेफर्सप्रमाणे) करून ते तळून घ्यावेत.
  • कढईत तेलामध्ये कांदा व लसूण लालसर होईपर्यंत परतवून घ्यावेत.
  • हिरव्या मिरचीचे लांबट चिरलेले तुकडे टाकून परतावेत. नंतर वाफवलेली भाजी फोडणीत परतून घ्यावी.
  • आवश्‍यकतेप्रमाणे मीठ व हळद टाकून भाजी तयार झाल्यानंतर, त्यावर तळलेले बटाट्याचे तुकडे पसरावेत.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, विकासपिडीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *