पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर गेला आहे. जवळपास सहा दिवसांनी हे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, बाधित संख्या आणि मृत्यू प्रमाणात घट होणे महत्वाचे असून, त्यासाठी जिल्हा परिषदेकडून दिवस-रात्र प्रयत्न केले जात आहे. नमुने तपासणीची संख्याही वाढविण्यात आली असून, घरी जावून सर्वेक्षण करण्यावर अधिक भर दिला जात आहे.

शहरातील करोनाच्या वाढत्या बाधित संख्येचा आलेख कमी-अधीक प्रमाणात होत आहे. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ग्रामीण भागात बाधित संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ३० जूनला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १० दिवसांहून थेट २० दिवसांवर गेला. मात्र, जुलै महिन्यात बाधित संख्या वाढली आणि ९ जुलैला रुग्ण दुपटीचा कालावधी कमी म्हणजेच १४ दिवसांवर आला. १९ जुलैला तर हा कालावधी तब्बल ९ दिवसापर्यंत खाली आला होता. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली.

वाढत्या बाधितांबरोबर मृत्युच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली, अशा परिस्थितीत आरोग्य विभागाकडून स्वॅब आणि रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट वाढविण्यात आले. त्याचबरोबर घरोघरी जाऊन ६० वर्षांपेक्षा जास्त वय आणि अन्य व्याधी असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात संसर्ग रोखण्यास प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, ४ ऑगस्टनंतर रुग्ण दुपटीचा कालावधी हळूहळू वाढू लागला. सुरवातीला १४ त्यानंतर १६ दिवसांवर दुपटीचा कालवधी होता. मात्र, ४ ऑगस्टला ग्रामीणमध्ये ९ हजार १६५ बाधित संख्या होती. तर गुरूवारपर्यंत (ता. २७) ग्रामीणमध्ये १८ हजार ९५६ बाधित संख्या पोहचली आहे. त्यावरून आज हा दुपटीचा कालावधी आता २२ दिवसांवर गेला आहे.

One thought on “ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २२ दिवसांवर”
  1. छान लेखण केले आहे.
    खूप खूप शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *