zilla parishad

बारामती, जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रकल्प

पुणे : जिल्हा परिषदेमार्फत रस्त्याचे स्थिरीकरण (रोड स्टॅबिलायझेशन) तंत्रज्ञानानाने करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवायचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती व जुन्नर तालुक्यात पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी पुणे ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरेल, अशी माहिती बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.

नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण रस्ते बांधणीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये रस्त्याचे स्थिरीकरण हे रोडस्टब या रशियन केमिकलद्वारा केले जाणार आहे. काकडे म्हणाले की, या तंत्रज्ञानामध्ये ४ टक्के सिमेंट व स्थानिक असलेली माती अथवा मुरुममध्ये रोडस्टब केमिकल मिसळून रस्त्याचा खालचा थर बनवला जातो. कॉम्पॅक्टरच्या सहाय्याने या थराची रस्त्याची घनता वाढविली जाते. हा बनविलेला थर काँक्रिट थरासारखा काम करतो. ज्यामुळे रस्ता खचत नाही व त्यावर अंतिम डांबराचा थर केला जातो.

या तंत्रज्ञानाने बनवलेल्या रस्त्याची भार सहन करण्याची क्षमता पारंपारिक रस्त्यांच्या तुलनेत पाचपट अधिक असते. आसाम, उत्तराखंड राज्यांमध्ये बरेच ग्रामीण रस्ते या पध्दतीने बनवले आहेत. सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार रस्तेबांधणी मध्ये १५ टक्के रस्ते हे नवनवीन तंत्रज्ञान वापरुन बांधण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

तंत्रज्ञानाने रस्ते बांधणीमध्ये पारंपारिक रस्ता बांधणीपेक्षा अंदाजित १० टक्के इतकी बचत होवू शकते. गुणवत्ताही उच्च प्रतिची असल्याने रस्त्याला खड्डे पडणार नाहीत. रस्त्याला लागणारे खडी, मुरुम अथवा माती यामध्येही बचत होणार असून रस्ते बांधणीला लागणारा वेळही वाचणार आहे.
– प्रमोद काकडे, सभापती बांधकाम व आरोग्य समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d