- खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्घाटक
- आमदार अतुल बेनके प्रमुख पाहूणे
- १६,१७ जानेवारी; बालगंधर्व रंगमंदिर कलादालन
- विशेष परिसंवादाचेही आयोजन
जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. शिवजन्मभूमीचे आमदार अतुल बेनके हे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील. छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिनी येत्या १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदीराच्या कलादालनात या प्रदर्शनास प्रारंभ होणार आहे.
जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चाईल्ड फंड इंडियाचे वरिषठ प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत मदने आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवनेरी ट्रेकर्समार्फत बोरी बुद्रुक पर्यटन व सांस्कृतीक वारसा संवर्धन समिती, चाईल्ड फंड इंडिया, जुन्नर वन विभाग, शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान, मोरे मिसळ व रेस्टॉरंट, तालिश रिसॉर्ट व फुडिज् किचन यांचा सहयोगाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादातून उलगडणार जुन्नरची गुपितं
जुन्नर तालुक्याचे बहुआयामी दर्शन घडविण्यासोबतच या परिसराच्या हजारो वर्षांतील उत्कांतीची आणि पर्यटन व निसर्ग वैभवाची गुपितं उलगडणाऱ्या विशेष परिसंवादाचे आयोजन या प्रदर्शनात करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता परिसंवादास प्रारंभ होईल. यात ‘पुरातत्विय उत्खननात उलगडलेले जुन्नर’ या विषयावर डेक्कन कॉलेजचे पुरातत्व विभागप्रमुख डॉ. पांडुरंग साबळे तर ‘प्रागैतिहासिक बोरी : ज्वालामुखीय राखेआडचं संपन्न विश्व’ या विषयावर डेक्कन कॉलेजच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुषमा देव व डॉ. शिला मिश्रा यांचे व्याख्यान होईल. निसर्गअभ्यासक सुभाष कुचिक हे ‘जुन्नरचे पर्यटन व निसर्गवैभव’ उलगडून सांगतील.
विद्यार्थी व अभ्यासकांना सुवर्णसंधी
एखाद्या तालुक्याचे इत्यंभूत दर्शन घडविणारे आणि व्यक्तीऐवजी विषयकेंद्रीत सादरीकरण असलेले बहुआयामी जुन्नर हे राज्यातील व कदाचित देशातीलही पहिलेच छायाचित्र प्रदर्शन असावे. सोबत संलग्न विषयांची प्रागैतिहासिक काळापासून सद्यस्थितीच्या विलोभनिय अविष्कारापर्यंतच्या बाबींशी थेट जोडणी करुन देणारे तज्ज्ञांचे परिसंवाद ही पुणे व परिसरातील विद्यार्थी, पर्यटक व अभ्यासकांसाठी आगळीवेगळी सुवर्णसंधी ठरेल. अधिकाधिक व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी केले आहे.