पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरूवारी (ता. १४) उर्वरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर तब्बल ४ महिने ९ दिवस मुक्काम करून मॉन्सून परतला आहे.

यंदा दोन दिवस आधीच राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनने एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ७ जून ही महाराष्ट्रातील आगमनाची व १५ ऑक्टोबर ही मॉन्सूनच्या महाराष्ट्रातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा मॉन्सूनने ५ जून रोजी महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यानंतर १० जून रोजी संपुर्ण महाराष्ट्र व्यापला.

नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या परतीची सीमा दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग

गुरूवारी (ता. १४) मॉन्सूनच्या परतीची सीमा कोहिमा, सिलचर, कृष्णनगर, बारीपाडा, मालकांगिरी, नालगोंडा, बागलकोट, वेंगुर्ला अशी होती. ईशान्य भारताचा काही भाग, पूर्व किनारपट्टी, गोवा आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशीराने ६ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू केला होता. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागातून, तर १२ ऑक्टोबर रोजी संपुर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागातून मॉन्सून परतला होता.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *