पुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. सोमवारी (ता. ११) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारी (ता. ८) वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला. सोमवारी (ता. ११) संपूर्ण झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागासह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे.

परतीची सीमा सिलीगुडी, मालदा, शांतीनिकेतन, मिदनापूर, बारीपाडा, चिंचवाडा, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदर होती. देशाच्या आणखी काही भागातून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा बहुतांश भाग, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशाचा आणखी काही भाग, तसेच ईशान्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.