राजस्थान, गुजरातच्या काही भागातून घेतली माघार

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत.

यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपुर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्यांनी सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट धरली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशीराने मॉन्सूनने वारे माघारी फिरले आहे.

पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरातमध्ये पावसाने उघडीप दिली असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी झाली आहे. तसेच या भागात वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार झाल्याने मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंत भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश संपुर्ण भाग, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशच्या काही भागातून मॉन्सून वारे परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *