पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून (ता. २) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
बिहार आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडू च्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे हवामान होते.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : रायगड, रत्नागिरी.
विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर.
विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
‘शाहीन’ चक्रीवादळ निघाले ओमानकडे
पुणे : अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची तिव्रता वाढून ‘शाहीन’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ पाकिस्थान, मकरान किनाऱ्याकडे जात असून, त्यानंतर दिशा बदलून ओमानकडे जाण्याचे संकेत आहेत. भारताच्या किनाऱ्यापासून दूर गेलेल्या या प्रणालीमुळे महाराष्ट्राला कोणताही धोका नाही.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले “गुलाब” चक्रीवादळ आंध्रप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातमधून अरबी समुद्रात गेल्यानंतर त्याचे पुन्हा चक्रीवादळात रुपांतरण झाले आहे. शुक्रवारी (ता. १) दुपारी ही वादळी प्रणाली देवभूमी द्वारिकेच्या पश्चिमेकडे ४४० किलोमीटर, इराणच्या चाबहार बंदरापासून पूर्वेकडे तर ४९० किलोमीटर तर ओमानच्या मस्कतपासून ६६० किलोमीटर अग्नेयेकडे अरबी समुद्रात होती.
अरबी समुद्रातील प्रणालीमुळे पश्चिमेकडे सरकून जात असली तरी गुजरातच्या किनाऱ्यालगत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मात्र या प्रणालीचा फारसा प्रभाव दिसला नाही.
मॉन्सून लवकरच परतीच्या प्रवासावर ?
अरबी समुद्रातील शाहीन चक्रीवादळ निवळल्यानंतर मंगळवारपासून (ता. ५) देशाच्या वायव्य भागात वाऱ्याची दिशा बदलणार असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी होण्याचे संकेत आहेत. या भागात मुख्यतः कोरडे हवामान होणार असल्याने बुधवारपासून (ता. ६) मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.