पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या “गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोचली आहे. गुरूवारी (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर शुक्रवारी (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळीची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकून जाणाऱ्या या प्रणालीमुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले “गुलाब” चक्रीवादळ रविवारी (ता. २६) आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. हे चक्रीवादळ आंध्रप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातकडे निघून गेले. बुधवारी (ता. २९) सकाळी ठळक कमी दाबाचे क्षेत्र असलेली प्रणाली दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये सक्रिय होती. गुरूवारी (ता. ३०) अरबी समुद्राकडे गेल्यानंतर ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत.

अरबी समुद्रातील प्रणालीमुळे दोन दिवस उंच लाटा उसळणार असून, ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी (ता. ३०) गुजरात आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर ही प्रणाली भारतीय किनाऱ्यापासून दूर पाकिस्तान आणि मकरान किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला या प्रणालीचा प्रभाव जाणवणार नाही.

राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

पुणे : ‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकून गेल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. गुरूवारी (ता. ३०) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्वविदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज आणखी तीव्र होणार आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
अरबी समद्रात तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे गुरूवारी (ता. ३०) उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : पालघर.
महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक.
विदर्भ : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *