पुणे : वादळी प्रणालीची तीव्रता ओसरत असली तरी, तिचा प्रभाव मंगळवारी (ता. २८) महाराष्ट्रात जाणवणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या महाराष्ट्रासाठी मंगळवारचा दिवस सतर्कतेचा ठरणार आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या जैसलमेर पासून, उदयपूर, अकोला, चंद्रपूर ते वादळी प्रणाली पर्यंत (डीप डिप्रेशन) हा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची विरली असून, उत्तर कोकणापासून वादळी प्रणाली पर्यंत पूर्व आणि पश्चिम दिशेने वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
गुलाब चक्रीवादळाच्या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. मंगळवारी (ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पश्चिम विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुसळधार वादळी पाऊस (रेड अलर्ट) :
कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,
मध्य महाराष्ट्र : नाशिक, धुळे, जळगाव.
जोरदार वादळी पाऊस (ऑरेंज अलर्ट) :
कोकण: मुंबई, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, नगर, पुणे.
वादळी पाऊस (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर.
विदर्भ : बुलढाणा, अमरावती, वाशीम.
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
बंगालच्या उपसागरात घोंगावणारे “गुलाब” चक्रीवादळ रविवारी (ता. २६) आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. या चक्रीवादळाची तीव्रता ओसरत असून, ही वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे येत आहे. महाराष्ट्र पार करून अरबी समुद्राकडे गेल्यानंतर गुरुवारनंतर (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत.
बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. रविवारी सायंकाळी चक्रीवादळ ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणम दरम्यान धडकले. त्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होत असून, सोमवारी दुपारी ही प्रणालीचे केंद्र छत्तीसगडमधील जगदलपूर पासून दक्षिणेला दिशेला ६५ किलोमीटर तर तेलंगणातील भद्रचलमपासून पूर्वेकडे १५० किलोमीटर अंतरावर होती. सोमवारी (ता. २७) रात्री या प्रणालीचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) होणार असून, ती पश्चिमेकडे महाराष्ट्राकडे सरकत आहे.