किती दिवस राहणार प्रभाव : या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे “गुलाब” चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. सोमवारी (ता. २७) ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत आहेत..
बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २४) तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढल्याने शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे वेगाने झेपावणारे चक्रीवादळ रविवारी ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणम दरम्यान धडकले. ही प्रणाली जमीनीवर येण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

त्यामुळे पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली. तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणामध्ये स्थानिक प्रशासनकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रात दोन दिवस जाणवणार प्रभाव
जमीनीवर आल्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता ओसरणार असून, आज (ता. २७) ही प्रणाली विदर्भापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोन दिवस प्रभाव जाणवणार आहे, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात सोमवारी (ता. २७) विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, तसेच मंगळवारी (ता. २८) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी (ता.२७) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
कोकण: रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिक.
मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ : गडचिरोली, यवतमाळ