आंध्रप्रदेश, ओडिशात सतर्कतेचा इशारा ; वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे येण्याचे संकेत

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार झाले आहे. शनिवारी (ता. २५) सायंकाळी या भागात “गुलाब” चक्रीवादळ घोंगावू लागले आहे. उद्या (ता. २६) संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला असून, ही वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे येण्याची चिन्हे आहेत.

बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली असून, आज पहाटे त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले होते. शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. ही प्रणाली ओडिशाच्या गोपाळपूरपासून अग्नेयेकडे ३७० किलोमीटर, तर आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणमपासून ४४० किलोमीटर पुर्वेकडे समुद्रात होती. हे वादळ आज (ता. २६) प्रणाली आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या विशाखापट्टणम, गोपाळपूर आणि कलिंगापट्टणम जवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली असून, उद्या (ता. २६) सायंकाळपर्यंत ही वादळी प्रणाली किनाऱ्याकडे येणार असून त्यावेळी ताशी ७५ ते ९५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याबरोबरच, आंध्र प्रदेश, आडिशा, तेलंगणा राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रणाली किनाऱ्याला धडकताना आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम, विजयनगरम, ओडिशातील गंजम या जिल्ह्याच्या किनाऱ्यालगतच्या सखल भागात अर्धा मीटर उंचीच्या लाटा शिरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राकडे येणार वादळी प्रणाली

उपसागरातील वादळी प्रणालीचा संभाव्य मार्ग पाहता उद्या (ता. २६) किनाऱ्याला धडकून, उत्तर आंध्रप्रदेश, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणातून सोमवारपर्यंत (ता. २७) महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाकडे येण्याचे संकेत आहेत. किनाऱ्याला धडकल्यानंतर या प्रणालीची तीव्रता कमी होत जाणार असली तरी, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता. २७) विदर्भ, मराठवाड्यात तर मंगळवारी (ता. २८) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्रांची साखळी

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत असतानाच अग्नेय अरबी समुद्रात पाकिस्थानच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, ते आणखी ठळक होण्याचे संकेत आहेत. तर सोमवारी (ता. २७) बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, मंगळवारपर्यंत (ता. २८) या भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *