कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप कायम आहे. आज (ता.३) कोकणात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह, मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. राजस्थानकडे सरकत जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून कमी दाब क्षेत्रांमधून बांग्लादेश, त्रिपुराकडे सरकला आहे.

राज्यात ३ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर दक्षिण भारतात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. आज (ता.३) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ३ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पडणाऱ्या पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *