पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९५ ते १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. २) जाहीर केला. तसेच, ऑगस्ट महिन्यात देशात ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाजही यावेळी वर्तविण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९६१ ते २०१० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२८.३ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महिन्यात देशात ९५ ते १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात देशाच्या वायव्य, पूर्व आणि ईशान्य भागात सरासरी ते सरासरी कमी पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये बहुतांशी भागात, तसेच महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये देशात सर्वसाधारण पाऊस
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून यंदा प्रत्येक महिन्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण म्हणजेच ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. १९६१ ते २०१० कालावधीत ऑगस्ट महिन्याची पावसाची दीर्धकालीन सरासरी २५८.१ मिलिमीटर आहे. ऑगस्टमध्ये मध्य आणि वायव्य भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य आणि मध्य भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘एल निनो’ स्थिती सर्वसाधारण
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसाधारण एल निनो स्थिती असून, ती मॉन्सून अखेरपर्यंत कायम राहणार आहे. तर विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पूर्व आणि मध्य भागातील समुद्र थंड होत आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामानंतर ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत.

‘आयओडी’ नकारात्मक
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या तापमानातील फरकाचा (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) मॉन्सूनच्या पावसावर प्रभाव पडतो. सध्या विषूववृत्तालगतच्या हिंद महासागरात नकारात्मक आयओडी स्थिती आहे. मॉन्सून हंगामाच्या शेवटपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. नकारात्मक आयओडी चांगल्या पावसासाठी पूरक मानला जातो.

महाराष्ट्रासाठी ऑगस्ट महिना चिंतेचा ?
मॉन्सूनच्या शवटच्या दोन महिन्यातील पावसाचा विचार करता, महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात कोकण, घाटमाथा वगळता राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून, उत्तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाचा अंदाज चिंता वाढविणारा आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *