पुणे : राज्यात पाऊस वाढण्यास अनुकूल हवामान होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती झाली असून, विदर्भासह राज्यात पाऊस वाढणार आहे. आज (ता. २९) कोकणात बहुतांशी ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकणार आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत असून, दोन दिवसात तो सर्वसामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे येणार आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती आणि मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे आल्याने पावसाला पोषक हवामान होऊन राज्यात पाऊस वाढणार आहे. सध्या राज्याच्या काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या श्रावण सरींनी बरसत आहेत.

आज रविवारी (ता. २९) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर वर्धा, नागपूर, गोंदिया, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातही मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.