पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता. ३१) नाशिक, ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमीनीवर आले असून, ते दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर सक्रीय आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला आहे. कर्नाटक राज्यात पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे जोडक्षेत्र आहे. तर कर्नाटक पासून केरळ पर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

वरील स्थिती पोषक ठरल्याने उद्या (ता. ३१) कोकण, मराठवाडा, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणातील ठाणे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा असून, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यासह अमरावती, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.