या भागात चांगल्या पावसाचे संकेत
अमोल कुटे
पुणे : मोठ्या खंडानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरीपाला जीवदान मिळाले. पुढील आठवडाभरात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. तर कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सातत्याने पडणारे खंड, कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्ट महिन्यातील अपुऱ्या पावसाने तर चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता मॉन्सूनच्या उर्वरीत हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर पूर्व विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.

१९ ते २५ ऑगस्ट या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता धुळे, नाशिक, नगर, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील बुलडाणा, अकोला, कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
मात्र दडी कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खुपच कमी होते. तेथे सरासरीच्या तुलनेत अवघा ३६ टक्के पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, पुणे, सातारा, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

पुढील दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (२७ ऑगस्ट २ सप्टेंबर) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

तर दुसऱ्या आठवड्यात (३ ते ९ सप्टेंबर) उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान पावसात पडलेल्या खंडामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३६ अंशांदरम्यान होते. पुढील आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २८ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात तापमान काहीसे कमी होऊन कमाल तापमानाचा पारा २६ ते ३० अंश, तर किमान तापमान २० ते २२ अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.