पुणे : राज्यात सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापाही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये सध्या ३८७.४३ टीएमसी (२७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांचा पाणीसाठा वाढण्यासाठी घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

जून महिन्यात झालेला पूर्वमोसमी पाऊस आणि मॉन्सूनचे दणक्यात आगमन झाल्यानंतर राज्यात कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात पावसाने जोर धरला. पाणलोटात झालेल्या पावसाने धरणांमध्ये पाणी येण्यास सुरूवातही झाली. मात्र २० जून नंतर पावसाने दडी मारल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

पाऊस पडलेल्या भागात धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा आहे. मात्र पावसाने ओढ दिलेल्या भागात विशेषतः पुणे, नगर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात, तसेच कोकण, पूर्व विदर्भातील अनेक प्रमुख धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा आहे. मराठवाड्यात गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पामध्ये सध्या उपयुक्त पाणासाठा आहे.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता मराठवाड्यात यंदा २५ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात ३१ टक्के, पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागात ३० टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात सुमारे २० टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभाग विभागात २५ टक्के आणि कोकण विभागात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

राज्यातील सर्वात मोठे उजनी धरण यंदाही अचल (मृत) पाणापातळीत गेले असून, धरणामध्ये सध्या उणे १० टक्के पाणीसाठा आहे. मात्र धरणाच्या अचल पाणासाठ्यात ५८.५३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणामध्ये चल (३६.२२ टीएमसी) आणि अचल पाणीसाठा मिळून ४१.३५ टीएमसी पाणी आहे. तर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात चल (२४.८१ टीएमसी) आणि अचल पातळीत मिळून ५०. ८६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *