अमोल कुटे

पुणे : राज्याच्या विविध भागात पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेली खरीपाची पीके पाण्याअभावी करपून चालली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, त्यानंतर राज्यात पाऊस सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल झाल्यानंतर कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. हंगामाच्या प्रारंभी चांगली सुरुवात झाल्याने पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली. मात्र २० जून पासून राज्याच्या विविध भागात पावसाने दडी मारली. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहेत.

राज्यात २४ ते ३० जून कालावधीत पडलेला पाऊस (सौजन्य : हवामान विभाग)

गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणांचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या घाटमाथ्यासह विदर्भात चांगलीच ओढ दिली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खुपच कमी झाले. उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यासह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तसेच विदर्भातील भंडारावगळता उर्वरीत सर्वच जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. तर सोलापूर, उस्मानाबाद, नगर, जालना, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्वभागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भाच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक, उत्तर भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरूवात होणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुढील दोन्ही आठवड्यातील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल किमान तापमान सरासरीच्या वर राहणार आहे. मराठवाड्याच्या बहुतांशी भागात तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. विदर्भातही कमाल किमान तापमानचा पारा सरासरीच्यावर ते सरासरी इतका राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *