पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिके चांगली उगवून आली. मात्र जून आणि जूलै महिन्यात पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. पाण्याअभावी पेरलेली पीके आता करपून जाऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. साबळे म्हणाले, ८ ते १० तारखेपासून पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारीत रहावे. यात शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीने सोयबीन, तूर यांची पेरणी करावी, खरीप ज्वारी आणि बाजरीची पीक घेणे योग्य राहील. १५ जुलैनंतर मूग, उडीद ही पीके घेणे योग्य नाही, त्याऐवजी सोयबीनची लागवड करावी. भुईमुगाची लागवड केली तरी चालेल, शेतकऱ्यांनी सोयीनुसार पीकांची लागवड करावी.

खरीपाची पेरणी झालेल्या भागात दाट पेरणी असेल तेथे विरळणी करावी. एक महिन्याचे पीक झाले असल्यास तेथे कोळपणी, खुरपणी करून तण नियंत्रण करावे. विरळणी केल्याने झाडांची संख्या कमी होईल, तसेच तण काढल्यानेही जमीनीतील पाण्याची मागणी कमी होईल.

पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा चटका वाढून, वाष्पीभवनाचा वेग वाढेल. फळपीके, फळबागांची नवीन लागवड केली असेल तर पाणी द्यावे. पाण्याची सोय आहे तेथे पेरणी झालेल्या खरीपाच्या पिकांनाही ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा पाट पाणी पद्धतीने पाणी द्यावे, असा सल्ला ही कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *