पावसाची उघडीप कायम राहणार ?

अमोल कुटे

पुणे : कोकण आणि घाटमाथ्यावर तुफान कोसळल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती ओसरली आहे. पुढील दोन आठवड्यात राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  
 
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र, कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा पुरक ठरल्याने कोकणासह घाटमाथ्यावर धो-धो पाऊस कोसळला. मराठवाडा, विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

गेल्या आठवड्यात (२२ ते २८ जुलै) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. २२ जुलै रोजी पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा आणि धरण क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली. जिल्हानिहाय पावसाचा विचार करता साताऱ्यात सरासरीपेक्षा ३९५ टक्के अधिक पाऊस पडला. कोल्हापूरमध्ये २५२ टक्के अधिक, साताऱ्यात २११ टक्के अधिक तर पुण्यात २२० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

घाटमाथ्यावरील पावसाने नाशिक जिल्ह्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला. विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, मराठवाड्यातील नांदेडमध्ये सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडला आहे. गेल्या आठवडाभरात मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात सर्वात कमी उणे ८७ टक्के म्हणजे अवघा १३ टक्के पाऊस झालाय. तर औरंगाबाद जिल्ह्यात उणे ४५ टक्के, सोलापूर उणे ३१ टक्के, जळगाव उणे २० टक्के आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात उणे ३३ टक्के पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (३० जुलै ते ५ ऑगस्ट) उत्तर कोकण आणि आतापर्यंत पावसाचे कमी असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यातही (६ ते १२ ऑगस्ट) उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरीत राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून, अधुन-मधून  हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. कोकणात मात्र पावसाच्या सरी सुरूच राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील दोन आठवड्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीच्या कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्यात दक्षिण कोकण आणि विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. मराठवाड्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *