विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढला आहे. उद्या (ता.३०) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग काहीसा उत्तरेकडे सरकला असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीवर आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश परिसरावर आहे. दोन दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार कडे सरकत आहे. अरबी समुद्रात किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार कमी झाला असून, तो महाराष्ट्रापासून उत्तर केरळ पर्यंत सक्रिय होता.

कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता असून, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड मध्य प्रदेशसह उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्येही पावसाचा जोर वाढणार आहे.

राज्यात ३० जुलै रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

दरम्यान, उद्या (ता.३०) कोकणातील ठाणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई, तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ३० जुलै रोजी जिल्हानिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

विदर्भात सर्वदूर पावसाची हजेरी

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर गेल्या काही दिवसापासून ओसरला असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

गरूवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात सर्वदूर पाऊस पडला. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ऊन सावल्यांच्या खेळात अधुनमधून हलक्या सरी येत होत्या. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सर्वाधिक ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

कोकण :
पालघर : जव्हार ३७, मोखेडा ३५.
रायगड : माथेरान ७०, पनवेल ३६, पेण ४४.

मध्य महाराष्ट्र :
नाशिक : इगतपुरी ६०, त्र्यंबकेश्वर ३५
पुणे : लोणावळा कृषी ३७, वेल्हे ३१.
सातारा : महाबळेश्वर ३४.

विदर्भ :
चंद्रपूर : चंद्रपूर ३०,
गडचिरोली : भामरागड ३०, चामोर्शी ३६, धानोरा ३०, मुलचेरा ४७.
गोंदिया : आमगाव ३०, देवरी ४०, गोरेगाव ३७, सालकेसा ३०.
नागपूर : कामठी ३०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *