हवामान विभाग ; देशात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जुलै महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. महाराष्ट्राचा विचार करता अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथे गुरूवारी (ता. १) आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज जाहीर केला. भारतीय हवामान विभागाने यंदा प्रथमच महिनानिहाय पावसाचा अंदाज जाहीर करण्यास सुरूवात केली आहे.

जुलै महिन्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचे प्रमाण दर्शविणारा नकाशा (सौजन्य : हवामान विभाग)

जुलै महिन्याच्या अंदाजानुसार देशभरात ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, वायव्य भारतातील राज्यांसह, दक्षिण भारत, पूर्व भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतके राहणार आहे. तर मध्य भारताचा काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्राचा विचार करता यंदाच्या जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

एल निनो स्थिती सर्वसामान्य
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य एल निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात उद्या तुरळक पावसाची शक्यता
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल झाल्यानंतर कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. मात्र, राज्याच्या विविध भागात अद्यापही पावसाची दडी कायम आहे. उन्हाचा वाढलेला चटका आणि ढगाळ हवामानामुळे उकाडाही चांगलाच वाढला आहे. राज्यात पाऊस जोर धरण्यास आणखी काही दिवस वाट पहावी लागणार असून, उद्या (ता.२) कोकणात काही ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरेली, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *