दिल्लीसह वायव्य भारतात मॉन्सूनचे आगमन लांबले

अमोल कुटे

पुणे : देवभुमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर उत्तरेकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वायव्य भारतातील वाटचाल मंदावली आहे. गुजरात, मध्य प्रदेशासह देशाच्या बहुतांशी भागात दाखल झाल्यानंतर मॉन्सून वाऱ्यांनी पुढे चाल केली नाही. पुरेसे पोषक हवामान नसल्याने राजधानी दिल्लीसह देशाच्या वायव्य भागातील मॉन्सूनचे आगमन लांबले आहे.

मॉन्सूनने १९ जून रोजी संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग, तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. बारमेर, भिलवाडा, अलिगड, आंबाला, अमृतसरपर्यंतच्या भागात मॉन्सूनने मजल मारली. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये मॉन्सून दाखल झालेला नाही.

उत्तर भारतात मॉन्सूनचे आगमन रेंगाळले असलेतरी देशाच्या बहुतांशी भागात यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने झाला आहे. जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोचणारा मॉन्सून यंदा १७ दिवस आधीच (१३ जून) या भागात पोचला. तर राजस्थानच्या पश्चिम भागात ५ जुलैपर्यंत पोचणारे मोसमी वारे यंदा १९ जून रोजी दाखल झाले. त्यानंतर वाऱ्यांची वाटचाल झालेली नाही.

नकाशातील निळ्या रेषा मॉन्सूनच्या वाटचालीची स्थिती दर्शवतात (सौजन्य : हवामान विभाग)

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा विचारात तर मोसमी वारे साधारणतः ८ जुलैपर्यंत देशभर पोचतात. गेल्यावर्षी २६ जून रोजी मॉन्सूनने संपुर्ण देश व्यापला होता. मात्र यंदा वायव्य भारतात मॉन्सून दाखल होण्यासाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा उशीर झाला आहे. २०१७ आणि २०१९ साली संपुर्ण देशात मॉन्सून दाखल होण्यास तब्बल १९ जुलै उजाडला होता. पुढील पाच ते सहा दिवस मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मॉन्सून संपुर्ण देशात दाखल होण्यास आणखी वाट पहावी लागणार आहे.

गेल्या काही वर्षातील मॉन्सूनची देशभरातील वाटचाल

वर्षदेश व्यापल्याची तारीख
२०१५२६ जून
२०१६१३ जुलै
२०१७१९ जुलै
२०१८२९ जून
२०१९१९ जुलै
२०२०२६ जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *