महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ऊस वाणाविषयी शेतकऱ्याकडून कृतज्ञता व्यक्त

राहुरी (अनिल देशपांडे ) : ऊसाच्या “को ८६-०-३२” वाणाच्या शिफारशीस या वर्षी २५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षात दुग्धशर्करा योग म्हणून सातारा जिल्ह्याच्या चोराडी (ता. खटाव) येथील बापू आण्णा पिसाळ या शेतकऱ्याने नव्या बंगल्यास “८६-०-३२ ची कृपा” असे नाव देवून या वाणाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बापू पिसाळ यांनी विद्यापीठाने प्रसारित केलेला “को ८६-०-३२” वाण चार एकर क्षेत्रात सलग चार वर्षे घेतला. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी त्यांच्या स्वप्नातील बंगला प्रत्यक्षात साकार केला. ११०० चौरस फुट स्लँबचा बंगला बांधला. केवळ ऊसाच्या या वाणामुळेच आपला हा बंगला पूर्ण झाला. त्यामुळे नव्या बंगल्यास “८६-०-३२ ची कृपा” असे नाव देवून या वाणाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संशोधन केंद्राने सन १९९६ साली उसाची “को ८६-०-३२” ही जात पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केलेली आहे. ऊस ऊत्पादक शेतकरी बापू पिसाळ यांनी त्यांच्या चार एकर क्षेत्रात सलग चार वर्षे ऊसाचा को ८६०३२ हा वाण घेतला. चारही वर्षे त्यांना एकरी शंभर टनांपर्यंत ऊत्पादन मिळाले. सह्याद्री सहकारी साखर कारखाना कराड ने हा ऊस गाळप केला. त्यांना अनुक्रमे ३१०० रुपये, २९०० रुपये, २८५० रुपये व यंदा २७५० रुपये प्रतिटन भाव मिळाला.

या शेतकऱ्याचा आदर सन्मान करावा व त्यांची भेट व मुलाखत घेणेसाठी नुकतेच मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या केंद्राचे प्रमुख ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर व त्यांच्या समवेत या केंद्रातील ऊस पैदासकार डॉ.रामदास गारकर व डॉ.माधवी शेळके, मृदशास्त्रज्ञ डॉ.सुभाष घोडके, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. सुरेश उबाळे, डॉ. दत्तात्रेय थोरवे हे शास्त्रज्ञ या वेळी हजर होते. शास्त्रज्ञांच्या व शेतकरी बांधवांसमवेत बापू कृष्णा पिसाळ यांना फेटा, श्रीफळ, ऊस मार्गदर्शन पुस्तिका व महात्मा फुले कृषि विद्यपीठाची कृषि दैनंदिनी देऊन सन्मानीत केले.

शेतकरी बापू पिसाळ यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. अशोक फरांदे यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली. एकरी १०० टन व त्याहुन अधिक उत्पादन कसे घेता येईल त्याचबरोबर उत्तम खोडवा व्यस्थापन, पाचट कुट्टी करून कुजवणे, ऊस बेणेमळा याबाबत डॉ. भरत रासकर यांनी मार्गदर्शन केले.

एका प्रगतीशील शेतकऱ्यानी अशा प्रकारे आपल्या बंगल्याला ऊसाच्या वाणाचे नावं देणे ही पाडेगाव ऊस संशोधन केंद्रासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे योगदान खरोखरंच खूप मोठं आहे.

– प्रशांत बेनके, नारायणगाव, जुन्नर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *