बंगालच्या उपसागरात होतेय कमी दाब क्षेत्राची निर्मिती

पुणे : बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्येकडे झुकलेल्या या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रासह, मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्यास पोषक ठरते.

कमी दाब क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पूर्व आणि मध्य भारतातून मॉन्सूनच्या आस असलेल्या कमी दाब क्षेत्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून अलिगड, जमशेदपूर या भागातून अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. मॉन्सून आसाचा पश्चिम भाग उत्तरेकडे सरकला असून, पुढील दोन दिवस तो उत्तरेकडेच राहणार आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर आहे.

अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारला आहे. वरील हवामान स्थिती पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

गुरूवारी (ता. २२) राज्यातील पावसाचा अंदाज (सौजन्य : कृषी विभाग)

उद्या (ता.२२) रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी
पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे सर्वाधिक १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :
पालघर : जव्हार ११७, विक्रमगड १३०, वाडा ११४,
रायगड : माथेरान ११४.
रत्नागिरी : चिपळूण १०४, जयगड १४५, राजापूर १३५, रत्नागिरी ११२, संगमेश्वर १५७.
सिंधुदुर्ग : वैभववाडी १५७.
ठाणे : ठाणे १०६.

मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : गगणबावडा १४९, पन्हाळा ५०, राधानगरी ६८, शाहूवाडी ६१.
नाशिक : हर्सूल ७५, इगतपुरी ९५, सुरगाणा ६२.
सातारा : महाबळेश्वर १६४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *