कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी (ता. २२) महाबळेश्वर येथे एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांकी ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथेही ४३४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. उद्या (ता.२३) राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. ही प्रणाली पूर्व आणि मध्य भारतातून मॉन्सूनच्या आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे सरकणार आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग उत्तरेकडे सरकला असून, तो पुन्हा दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर आहे.

अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत विस्तारला आहे. ही हवामान स्थिती पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. तर मराठवाडा विदर्भातही पाऊस पडत आहे. महाबळेश्वर येथे एका दिवसातील आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकी ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यापुर्वी ७ जुलै १९७७ रोजी तेथे ४३९.८ मिलीमीटर पावसाचा नोंद झाली होती.

शुक्रवारी (ता. २३) राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

उद्या (ता.२३) कोकण, मुंबईसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात मुसळधार पाऊस पडलेली ठिकाणे, पाऊस मिलीमीटरमध्ये

४०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस :
महाबळेश्वर ४८० (सातारा), जव्हार ४३४, वाडा ४१८ (पालघर).

३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस :
माथेरान ३३१, कर्जत ३२१ (रायगड), पेठ ३१५ (नाशिक), लोणावळा कृषी ३३० (पुणे).

२०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस :
मोखेडा २८९, विक्रमगड २३१ (पालघर), खालापूर २०२, महाड २०७, पोलादपूर २७१, सुधागडपाली २२० (रायगड) लांजा २२०, संगमेश्वर २५२ (रत्नागिरी), मुरबाड २२९, शहापूर २०५ (ठाणे), गगणबावडा २६५ (कोल्हापूर), हर्सूल २३३, इगतपुरी २४०, ओझरखेडा २४९, त्र्यंबकेश्वर २१६ (नाशिक).

१५० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस :
माणगाव १६८, तळा १७७ (रायगड), दापोली १६०, खेड १९५, मंडणगड १६५ (रत्नागिरी), कल्याण १८९ (ठाणे), राधानगरी १८८ (कोल्हापूर), पाटण १६३ (सातारा) बार्शी टाकळी १६८ (अकोला).

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोटामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर तब्बल महिनाभर राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर धरला नव्हता. कोकण आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पुर्वेकडील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. तर मध्य महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या तालुक्यांत विषेशतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने मोठी ओढ दिली होती.

मात्र दोन-तीन दिवसांपासून नाशिक, नगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरूवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : जलसंपदा विभाग)

पुणे विभाग : डिंभे १२९, पानशेत १५५, वरसगाव १५३, पवना २३२, मुळशी ३७०, चासकमान ६८, आंद्रा ६९, निरा देवघर २४९, धोम १६८, कन्हेर ९२, धोम बलकवडी ३१०, वारणा १८५, दुधगंगा ११७, राधानगरी १९४, कोयना ३४७.

नाशिक विभाग : दारणा ७०, गंगापूर २३७, भंडारदरा १९०.

कोकण विभाग : भातसा ३३६, सुर्या धामणी १५६, वैतरणा २२५.

मराठवाडा विभाग : पुर्णा येलदरी ७७, माजलगाव ६७.

नागपूर विभाग : गोसीखुर्द १०२.

अमरावती विभाग : उर्ध्व वर्धा ८५, काटेपुर्णा १३६, पेनटाकळी ६१.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *