परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी , निर्यातक्षम कृषी माल व उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र यावे. भरघोस उत्पादन, उत्पन्न वाढीसह शेतीमालाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्येक टप्प्यात अवलंब करावा, असे आवाहन खरगपुरमधुन आयआयटी व आयआयएम अहमदाबाद येथील तज्ञ मार्गदर्शक, वित्तीय सल्लागार दिलीप देशमुख यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, ‘आत्मा ‘ प्रकल्प कृषी विभाग, मुंबईतील डेक्कन ॲग्रो रिसर्च मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतमाल विक्री व व्यवस्थापन” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, कृषिभूषण शेतकरी कांतराव देशमुख झरीकर, डेक्कन ॲग्रो रिसर्च मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रजनीकांत नलावडे, आत्मा प्रकल्पाचे माजी प्रकल्प संचालक अशोकराव काळे, प्रगतीशील शेतकरी एकनाथराव साळवे यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, आयआयटी खरगपुर व मुंबईच्या माध्यमातून शेती पिकांवरील विविध समस्या व त्यावरील प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. या दोन्ही तज्ञ संस्थामधुन शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञाकडून उत्तरे मिळतात. शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपले आर्थिक उन्नतीसाठी एकत्र येऊन पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे. उत्पन्नासह शेतीमालाचा उच्च दर्जा राखावा. बाजारपेठेचा देखील अभ्यास करताना शेतीमालाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून अधिक नफा मिळवता येईल, याकडे लक्ष द्यावे.

अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, जिल्हयात सोयाबीन, तूर, कपाशी, हरभरा व हळद या पिकांचे मोठे उत्पादन होते. परंतु त्याला रास्त भाव व जादा एकरी उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया आणि मार्केटिंग याकडे लक्ष द्यावे.

रजनीकांत नलावडे म्हणाले, शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीमाल उत्पादित करतो परंतु त्या शेती मालाला चांगली बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शाश्वत व नियमित उत्पन्न मिळत नाही . पिकांचे उत्पादन घेताना आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर माती परिक्षण ते मार्केटींगपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात केला जात नाही. डेक्कन ॲग्रो रिसर्च मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडचे माध्यमातून या सर्व सोयी सुविधांसह शेतकऱ्यांच्या दर्जेदार व गुणवत्तापुर्ण मालाला रास्त भाव व बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जातील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव कदम यांनी केले तर कार्यशाळेसाठी कैलास काळे, रामप्रसाद काळे, नारायणराव धस, रासवे गूरुजी आदींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: