अमोल कुटे

पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. जळगाव येथे कमाल तापमान दहा वर्षांतील उच्चांकी ४० अंशांवर पोचले आहे. यातच तापमानात सरासरीपेक्षा ५ अशांहून अधिक वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे धामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

मॉन्सूनचे दमदार आगमन झाल्यानंतर २० जूनपासून राज्याच्या विविध भागात पावसाने ओढ दिली आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही असह्य होत आहे. जळगाव येथे उन्हाचा ताप खुपच वाढला असून, सोमवारी (ता. ५) गेल्या दहा वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यापुर्वी २ जुलै १९९३ रोजी जळगावात आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

जळगावसह पुणे, महाबळेश्वर, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. किमान तापमानातही १ ते ३ वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा चांगलाच जाणवत आहे. तापमानात घट होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता. ५) नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ :

पुणे ३३.५(४.५), जळगाव ४०.० (५.८), कोल्हापूर २९.७(२.२), महाबळेश्वर २४.४(४.२), मालेगाव ३६.०(३.८), नाशिक ३२.९, सांगली ३०.५(१.१), सातारा ३२.४(४.९), सोलापूर ३६.०(३), मुंबई (कुलाबा) ३३.०(२.६), अलिबाग ३२.६(२), डहाणू ३३.५(२.२), रत्नागिरी ३१.२(१.९), औरंगाबाद ३५.२(४.४), परभणी ३७.०(४.७), अकोला ३८.८(५.६), अमरावती ३७.१(५.१), बुलढाणा ३४.४(४.७), ब्रह्मपूरी ३५.४(३.५), चंद्रपूर ३३.३(०.५), गोंदिया ३५.०(२.५), नागपूर ३६.३(३.८), वर्धा ३७.५ (५.२), यवतमाळ ३७.२.(५.८).

पावसासाठी पोषक हवामान
राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. गुरूवारपासून (ता.८) मॉन्सून सक्रीय होऊन पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता.६) चंद्रपूर, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *