पुणे : जवळपास दोन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. गुरूवारपासून (ता.८) मॉन्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ११) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेतही भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिले आहेत.

सांख्यिकीय हवामान अंदाज प्रारूपानुसार (न्युमरीकल वेदर प्रेडीक्शन मॉडेल) दक्षिण भारतातील राज्य आणि पश्चिम किनारपट्टीय भाग, पूर्व मध्य भारतात ८ जूलैपासून मॉन्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात रविवार ११ जुलैपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

गुरुवारपासून (ता. ८ जूलै) बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे पूर्व भारताकडे येणार आहे. शनिवारपर्यंत (ता.१०) हे वारे वायव्य भारतातील पंजाब, हरियाणापर्यंत पसरणार आहे. त्यामुळे मध्य आणि वायव्य भारतात पावसासाला सुरूवात होणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

केरळात तीन जून रोजी दाखल झाल्यानंतर वेगाने वाटचाल करत १९ जून रोजी मॉन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला. बारमेर, भिलवाडा, अलिगड, अंबाला, अमृतसरपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मात्र मॉन्सूनची पुढील वाटचाल पुर्णपणे थांबली. शनिवारपासून (ता.१०) मॉन्सूनचा वायव्य भारतील प्रवास पुन्हा सुरू होणार असून, दिल्लीसह, पंजाब हरियाणा, राजस्थानच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

गुरूवार (ता. ८) राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

गुरुवारपासून राज्यात पावसाला सुरूवात
राज्याच्या अनेक भागात पुढील दोन दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर गुरूवारपासून (ता. ८) राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात होणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. गुरूवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: