पावसाच्या दडीने पीके धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुणे : दक्षिण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची दडी असल्याचे चित्र कायम आहे. निम्मा जुलै महिना उलटूनही अनेक भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे.

मॉन्सूनच्या आगमनानंतर अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने पावसाने दडी मारली. उगवून आलेली पिके पावसाअभावी कोमेजून गेली. त्यानंतर हलक्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. मात्र पुन्हा पावसाच्या दडीने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाण्याअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होणार असल्याने जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागर आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाबाची क्षेत्र तयार झाली. याचवेळी मॉन्सूनने संपुर्ण देश व्यापला आणि या दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) सक्रीय झाला. मध्य भारतात असलेल्या या पोषक स्थितीमुळे कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली.

मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र फार काळ टिकले नाही. गुजरात लगतचे कमी दाब क्षेत्र गुरूवारी (ता. १५) विरून गेले असून, मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागला आहे. कर्नाटक आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर कोकणापर्यंत विस्तारलेला नाही. त्यामुळे राज्यात अद्यापही पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा आहे.

गुरूवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाची मुसळधार कायम होती. तर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडला. राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप कायम आहे.

गुरूवारी (ता. १५) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये

कोकण :
रायगड : म्हसळा १२०, मुरूड १२५, श्रीवर्धन १०५, तळा १०५.
रत्नागिरी : लांजा १४८, मंडणगड १०१, राजापूर १०७, रत्नागिरी १०२.
सिंधुदुर्ग : देवगड १४४, दोडामार्ग १४०, कणकवली १४६, कुडाळ १६४, मालवण १९८, मुलदे (कृषी) १९९, रामेश्वर १३४, सावंतवाडी १९०, वैभववाडी ११२, वेंगुर्ला १५९.

मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : चंदगड ६१, गगणबावडा १५६, राधानगरी ७२.
सातारा : महाबळेश्वर ६२.

मराठवाडा :
परभणी : मानवत ६८, पालम ६२.

विदर्भ :
चंद्रपूर : जेवती ५०,
वाशिम : मंगरूळपीर ५८.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *