अमोल कुटे

पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावलीय. तर विदर्भातही सरासरी गाठलीये. मध्य महाराष्ट्रात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पुढील दोन आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.  
 
जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली. त्यानंतर गेल्या आठवड्यात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रांमुळे मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला. मॉन्सून वाऱ्यांनी १३ जुलै रोजी संपुर्ण देश व्यापला. राज्यातही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
 
गेल्या आठवड्यात (८ ते १४ जुलै) दक्षिण कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात पावसाने दणक्यात हजेरी लावली. तर उत्तर कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाची दडी कायम असल्याचे चित्र पहायला मिळाले. कोकणातील पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली. नंदूरबारमध्ये सरासरीच्या तुलनेत अवघा १४ टक्के पाऊस पडलाय. तर सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने कशीबशी सरासरी गाठली.

८ ते १४ जुलै या कालावधीत राज्यात पडलेला पाऊस (सौजन्य हवामान विभाग)

मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस पडला. सरासरीचा विचार करता अनेक जिल्ह्यात दुप्पट ते चौपट पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात तर सरासरीपेक्षा ४०१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. बुलडाणा, अमरावती, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली, तर उर्वरीत विदर्भात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला.

पुढील दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (१६ ते २२ जुलै) राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असून, राज्यातील चारही विभागात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. 

१६ ते २२ जुलै या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

दुसऱ्या आठवड्यातही (२३ ते २९ जुलै) कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असेल. तर मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी होऊन सरासराच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

२३ ते २९ जुलै या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

पुढील दोन्ही आठवड्यांचा कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केलाय. यात पहिल्या आठवड्यात राज्यात कमाल तापमान सरासरीच्या वर, तर दुसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतके राहणार आहे. तर दोन्ही आठवड्यात किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुढील दोन आठवड्यातील कमाल तापमानाचा अंदाज

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: