कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा पाच दिवस आधीच संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रीय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

मॉन्सनने गुरूवारी (ता. १०) संपुर्ण महाराष्ट्र राज्य व्यापले. मुंबईसह कोकण, विदर्भात पावसाने जोर धरला असला तरी उर्वरीत राज्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. ओडीशा आणि पश्चिम बंगाल लगतच्या समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर अरबी समुद्राच्या मध्य भागात असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रीय आहे.

ही स्थिती पुरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्वउतारावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारपर्यंत (ता. १४) राज्यात विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : पुणे वेधशाळा, हवामान विभाग)

मॉन्सूनची वाटचाल सुरूच
महाराष्ट्र राज्य व्यापल्यानंतरही मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. आज (ता. ११) मॉन्सूनने दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. दोन दिवसात मॉन्सून उत्तर भारतातील राज्यात प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *