डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या सवलतीत वाढ

पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मिळणाऱ्या सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी (शुन्य टक्के) पीक कर्ज मिळणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शेतकऱ्यांनी तीन लाखांपर्यत शुन्य टक्के दराने पीक कर्ज उपलब्ध करून देत होती. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून एक लाख ते तीन लाखांच्या कर्जाची विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्या एक टक्के व्याज सवलत देण्यात येत होती. यात आणखी दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये मुदतीत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के आणि ३ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी १ टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती, आता १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत मिळणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर सरसकट ३ टक्के व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल.

केंद्र सरकारकडूनही तीन लाखांपर्यतच्या कर्जाची परतफेड मुदतीत केल्यास ३ टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

कृषि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आदी कृषि निविष्ठा खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: