महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बियाणे विक्री यंदाही ऑनलाईन

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत ७८०’ या वाणाचे कांदा बियाणे प्रतिकिलो दोन हजार रुपये दराने मिळणार आहे. यासाठी यंदाही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणी प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणाला नेहमीच प्रचंड मागणी असते. कोरोना विषाणू संसर्गामुळे विद्यापीठाच्या कांदा बियाणाची विक्री मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला होता. यावर्षीही नोंदणी पद्धतीत आणि संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करून ऑनलाईन पद्धतीनेच कांदा बियाणे विक्री करण्याचा मानस कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केला. संगणक प्रणालीमध्ये योग्य तो बदल करून ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्रीचा निर्णय संशोधन संचालक डॉ. शरदराव गडाख यांनी घेतला.

अशी करा बियाण्यांसाठी नोंदणी
विद्यापीठाच्या ‘फुले ॲग्रो मार्ट‘ या पोर्टलवर १४ जूनपासून बियाणे संपेपर्यंत कांदा बियाणे खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे. प्रति आधारकार्ड, सातबारा उतारा दोन किलो बियाणे या प्रमाणात ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत ७८०’ या बियाणे उपलब्ध होईल. नोंदणी पद्धत अत्यंत सोपी असून आधारकार्ड आणि सातबारा उतारा पोर्टलवर अपलोड करून, ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पुर्ण होईल.

जवळच्या संशोधन केंद्रांवर मिळेल बियाणे
बियाणाची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत, धुळे, राहुरी येथील त्यांच्या जवळच्या संशोधन केंद्रावर बियाणे पुरवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. डॉ. प्रमोद बेल्हेकर आणि त्यांच्या विपणन ग्रुपकडून पार पाडण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बियाणे वाटपात मास्क, सोशल डिस्टंसिंगचा वापर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाणांची उपलब्धता दिसते तोपर्यंतच नोंदणी करावी, पोर्टलवरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही.

– डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: