पुणे : वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले. मॉन्सूनची मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, उद्या (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मॉन्सूनला चाल मिळल्याने गुरूवारी (ता.२७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागात केलेली वाटचाल केली. यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनची आगमन लांबले.

आता जवळपास आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात ढग गोळा होत असून, पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या सुधारीत अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *