मॉन्सून हंगामात १०१ टक्के पाऊस ; हवामान विभागाचा सुधारीत अंदाज

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०१ टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १) जाहीर केला. विशेष म्हणजे देशभारातील पावसाचा विचार करता पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात (खरीप पट्ट्यात) यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६) टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १६ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टींग सिस्टिम’(एसईएफएस) मॉडेलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सुधारीत अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता ८ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. या अंदाजात चार टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

नकाशा : मॉन्सून हंगामातील पावसाची शक्यता (सौजन्य हवामान विभाग)

आयएमडीच्या मल्टीमॉडेल एन्सेंबल फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (एमएमई) यंदा सरासरी इतक्या (९६ ते १०४ टक्के) पावसाची शक्यता आहे. हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज :

विभागअंदाज
वायव्य भारत९२ ते १०८ टक्के
मध्य भारत१०६ टक्के
दक्षिण भारत९३-१०७ टक्के
ईशान्य भारत९५ टक्के

एल निनो स्थिती सर्वसामान्य

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य एल निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रथमच जून महिन्याचा अंदाज जाहीर

भारतीय हवामान विभागाने यंदा प्रथमच जून महिन्याच अंदाज जाहीर केला आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमानाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावरही परिणाम होतो. यंदाच्या जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्राचा विचार करता यंदाच्या जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि विदर्भात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

नकाशा : जून महिन्यातील पावसाची शक्यता (सौजन्य हवामान विभाग)

महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत

मध्य भारतात १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडणार आहे. संपुर्ण मॉन्सून हंगामाचा विचार करता यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने प्रसिध्द केलेल्या नकाशा वरून स्पष्ट होत आहे.

मॉन्सूनचे आगमन जाहीर करण्यासाठी आकाशातील ढगांचे आच्छादन, पावसाची हजेरी आणि जमीनीलगत तसेच ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत नैर्ऋत्येकडून वारे वाहणे आवश्यक आहे. ही स्थिती नसल्याने केरळातील मॉन्सून आगमनाची वेळ बदलावी लागली. मॉन्सून तीन जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. मॉन्सून यापुर्वीच केरळात दाखल झाल्याच्या वृत्ताशी सहमत नाही.

– डॉ. मृत्यूंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *