पुणे : मॉन्सूनची मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्यानंतर मॉन्सून एस्प्रेस सुसाट वेगाने धावू लागली आहे. आज (ता.४) मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत उत्तर कर्नाटक, आंध्रप्रदेश पर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशीराने दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या “यास” चक्रीवादळाने मॉन्सूनचा वेग काही काळ वाढविला. मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असतानाच, मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले.

जवळपास आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले. नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशीराने मॉन्सून गुरूवारी (ता. ३) दक्षिण केरळात डेरे दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत संपुर्ण केरळसह, कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, कर्नाटकचा दक्षिण अंतर्गत भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, तसेच बंगालच्या उपसागसाच्या काही भागात प्रगती केली आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

वाटचालीस पोषक हवामान असल्याने संपुर्ण कर्नाटक, गोव्यासह, महाराष्ट्राच्या काही भागात मॉन्सून दाखल होणार आहे. तसेच संपुर्ण तामिळनाडू व्यापून, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ईशान्य भारताच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *