पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपुर्ण राज्य व्यापले असले तरी, अद्यापही राज्याच्या विविध भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. पावसाची दडी कायम असलेल्या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावू नये यासाठी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि कोकणात चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी पावसाच्या वितरणात खंड पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. भात पिकासाठी रोपवाटिका ची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. तर ८० ते १०० मिलीमीटर पावसानंतर पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे पावसाची दडी असलेल्या भागात शेतकऱ्यांनी यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले की, पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करु नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा, मुग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ, तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सुर्यफुल या अवलंब करावा.

पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तुर अंतरपीक पद्धती अवलंबावी. पाणी साठवणुकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी पाडून त्यात पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील.

कोकणात भात रोपांच्या रोपवाटिका दोन टप्प्यात कराव्यात. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार भात रोपांची पुनर्लागण करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या वेळी योग्य वयाचे रोप उपलब्ध होईल. पीक काढणीच्या वेळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. साबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: