पुणे : देवभूमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसात देशाच्या बहुतांशी भागात पोचणाऱ्या मॉन्सून एक्सप्रेसला ब्रेक लागला आहे. तीन दिवसांपासून मॉन्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही. वाटचालीस पोषक वातावरण नसल्याने राजधानी दिल्लीसह देशाच्या उर्वरीत भागात मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे. दरम्यान राज्याच्या अनेक भागत अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

मे महिन्याच्या मध्यावर अरबी समुद्रात आलेल्या “ताऊते” चक्रीवादळामुळे विषुववृत्ताकडून येणारे प्रवाह सुरळीत झाल्याने मॉन्सूनच्या आगमानासाठी पोषक वातावरण तयार झाले. मॉन्सून केरळात लवकर दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली. हे चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला धडकते तोच बंगालच्या उपसागरात मॉन्सूनने चाल करत अंदमान निकोबार बेटांवर हजेरी लावली (ता.२१ मे) याच दरम्यान बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळाची निर्मिती झाली.

या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनला काही काळ गती मिळाल्याने वाऱ्यांनी संपुर्ण अंदमान बेटांसह, दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप, कोमोरीन भागात मजल मारली. त्यानंतर मात्र वाऱ्यांची दिशा आणि ढगांची निर्मिती आणि पावसाचे प्रमाण कमी असल्याने केरळमधील मॉन्सूनचे आगमन लांबले. यंदा नियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशीराने मॉन्सून केरळमध्ये (३ जून) दाखल झाला.

केरळात दाखल होताच, मॉन्सून एक्सप्रेसचा प्रवास सुसाट वेगाने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत मॉन्सून दोनच दिवसात महाराष्ट्रात (५ जून) दाखल झाला. तसेच मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच (१० जून) संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. त्यानंतर तीनच दिवसांत (ता. १३ जून) ईशान्य भारतासह, पश्चिम बंगाल, बिहारसह पूर्व भारत, जम्मू काश्मीरचा भाग व्यापून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भागात मॉन्सून पोचला.

पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने मॉन्सून एक्सप्रेसला ब्रेक लागला आहे. पुढील पाच दिवस मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता नसल्याने राजधानी दिल्लीसह वायव्य भारतातील वाऱ्यांचे आगमान लांबणार आहे. सध्या सुरत, नंदुरबार, भोपाळ, बरेली, अमृतसरपर्यंतचा मॉन्सूनची वाटचालीची सीमा कायम आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रतिक्षा
संपुर्ण राज्यात मोसमी वारे पोचले असले तरी, शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावणाऱ्या मॉन्सूनने, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्याच्या बुहतांशी भागात जोरदार पावसासाठी वाट पहावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *