ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज दक्षिण अशिया कृषी हवामान फोरमचे सदस्य, कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडणार असून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिल, डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. सन २०२१ मधील मार्च, एपिल, मे या तीन महिन्यातील कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर आधारीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

डॉ. साबळे म्हणाले, यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज असला तरी काही भागात, कमी कालावधीत जोराचे पाऊस होणे शक्य आहे. वाऱ्याचा वेग कमी, सुर्य प्रकाशाचा कालावधी, तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांमध्ये अकोला, पेडगाव निफाड येथे पावसात मोठे खंड पडतील. तर दापोली, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव, परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.

जून, जुलै महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असली तरी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहेत. विभागानुसार दिलेल्या पावसाच्या अंदाजात तालुकानिहाय फरक पडणे शक्य असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

असे करा पीक नियोजन !

पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करु नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा, मुग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ, तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सुर्यफुल या अवलंब करावा. पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तुर अंतरपीक पद्धती अवलंबावी. पाणी साठवणुकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी पाडून त्यात पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील.

खरीप पीके काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ती काढून त्याची मळणी करणे व माल सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे राहील. त्यामुळे नुकसानीपासून बचाव होईल. कोकणात भात रोपांच्या रोपवाटिका दोन टप्प्यात कराव्यात. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार भात रोपांची पुनर्लागण करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या वेळी योग्य वयाचे रोप उपलब्ध होईल. पीक काढणीच्या वेळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) ठिकठिकाणचा पाऊस :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *