तीन जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल मंदावली आहे. वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय नसल्याने आणि पुरेसे बाष्प व पावसाने दडी मारल्याने मॉन्सूनचे केरळमधील आगमान लांबणार आहे. मॉन्सून तीन जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुसंडी मारत मॉन्सूनने संपुर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह व्यापला. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळ तयार झाल्याने मॉन्सूनला चाल मिळली. गुरूवारी (ता.२७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागात केलेली वाटचाल रविवारी (ता.३०) कायम आहे.

दरम्यान, यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली होती. आता मंगळवारपासून (ता.१) नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार असून, त्यानंतर केरळात पाऊस सूरू होणार आहे.

त्यामुळे यंदाचा मॉन्सून गुरूवारी (ता. ३) केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *