निवडणुक आयोगाने मागविला जिल्हा प्रशासनाकडून अहवाल

पुणे : मुदत संपलेल्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गाची स्थिती काय आहे. त्या ठिकाणी मतदान घेणे शक्‍य आहे की नाही याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना राज्य निवडणुक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अहवालानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग सुरू झाला. संसर्ग वाढल्याने काही दिवसात शहरासह देशात टाळेबंदी जाहीर झाली आणि सर्व अर्थचक्रच थांबले. त्यामध्ये एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपेल त्याठिकाणी प्रशासकाची नेमणूक करावी. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे ग्रामपंचायतींची मुदत टप्प्याटप्प्याने संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक केली जात आहे.

दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्यावा लागणार आहे. तर राज्य निवडणुक आयोग्यही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याबाबत विचारार्थ आहे. मात्र, राज्यातील गावांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर काही ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचा संसर्ग नाही, तर अनेकांनी हा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ज्या गावांमध्ये कोरोना संसर्ग नाही किंवा आटोक्‍यात आहे, अशा ठिकाणी मतदान घेणे शक्‍य आहे का ? याचा अहवाल येत्या २१ सप्टेंबरपर्यंत निवडणुक आयोगास सादर करावा. जेणेकरून आयोगाला निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेणे शक्‍य होईल, असे आदेशामध्ये म्हटले आहे.

राज्य निवडणुक आयोगाकडून आलेल्या सूचनानुसार ग्रामपंचायतींची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून निवडणुक आयोगाकडे पाठविण्यात येईल.

– संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *