करडई

शास्त्रीय नाव: कार्थेमस टिंक्टोरियस (Carthamus tinctorius)
इंग्लिश नाव : सॅफ्लॉवर (Safflower)
कूळ : अस्टरेसी
हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते. फुलांपासून पाण्यात विरघळणारा पिवळा आणि दुसरा अविद्राव्य गडद लाल असे दोन रंग मिळतात.

औषधी गुणधर्म

  • करडईची पाने चवीला कडवट असून ती पाचक आहेत. कोवळ्या पानांची भाजी करतात.
  • पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, फॉस्फरस व कॅल्शियम असते.
  • फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात.
  • करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात.
  • करडईच्या बियांपासून चवहीन व रंगहीन, परंतु भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. या तेलात वेगवेगळी मेदाम्ले असतात.
  • करडईच्या तेलात ओलेइक आम्ल व लिनोलिइक आम्ल असतात. ही आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात.

करडईची भाजी

साहित्य

करडईची भाजी, बेसनपीठ, लसूण, हिरवी मिरची, जिरे, तेल, मोहरी, हिंग पावडर, शेंगदाणे, मीठ,

कृती

  • करडईची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.
  • पाणी टाकून चिरलेली भाजी व शेंगदाणे उकडून घ्यावी.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, लसूण, हिंग पावडर, चवीनुसार मीठ घालून फोडणी करावी.
  • उकडलेली भाजी व शेंगदाणे त्यात टाकावे.
  • मंद आचेवर भाजी पुन्हा परतून घ्यावी.
  • भाजी एकजीव होण्यासाठी शिजताना त्यात बेसनपीठ सोडावे.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, विकीपीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *