सराटा / गोखरू

शास्त्रीय नाव : ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस (Tribulus terrestris)
कुळ : झायगोफायलेसी (phyllaceae)
इंग्रजी नाव : स्मॉल कॅलट्रोप्स (Small caltropes)
स्थानिक नाव : गोखरू, सराटा, काटे गोखरू, लहान गोखरु, गोक्षुर.
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात सराटा ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते. शेतात, ओसाड, पडीक जमिनीवर ही तण म्हणून सर्वत्र आढळते. सराटा/गोखरू हे तण असले तरी, ती महत्त्वाची औषधी वनस्पती असून तिला वर्षभर फुले व फळे येतात.

औषधी गुणधर्म

  • सराट्याचे मूळ व फळे औषधात वापरतात. गोखरूचे मूळ दशमुळातील एक घटक आहे.
  • सराटा स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य आहे. गोखरू शीतल असून, मूत्रपिडांस उत्तेजक आहे.
  • सराट्याची फळे मूत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत.
  • फळांचा काढा संधिवातावर आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे.
  • मूत्रपिंडाच्या दुबळेपणात पाण्यात धने, जिरे, सराटा समप्रमाणात घेऊन कुटून, उकळवून गार करून घेतल्यास मूत्रप्रवृत्ती सुधारते, मूत्रपिंडास ताकददेखील येते.
  • धातूपुष्टतेसाठी सराटा, गुळवेल आणि आवळे समभाग घेऊन त्याचे चूर्ण दुधातून द्यावे.
  • आमवातात सराटा व सुंठ यांचा काढा उपयुक्त आहे. पंडुरोगावर सराटाचा काढा मध घालून देतात.
  • गर्भाशयाची शुद्धी होऊन वांझपणा नाहीसा होण्यासाठी सराटा वापरतात. गर्भिणीच्या धुपणीस सराटा चूर्ण खडीसाखर व तुपात कालवून देतात.
  • धातुविकार व प्रदर या विकारांवर सराट्याची फळे तुपात तळून त्याचे चूर्ण करून गाईचे तूप व खडीसाखर घालून देतात.
  • मूतखडा वारंवार होऊ नये म्हणून सराट्याची भाजी उपयोगी पडते.
  • छाती भरली असल्यास सराट्याची कोरडी भाजी देतात. कंबरदुखी, अंगदुखी यासाठीसुद्धा भाजी उपयोगी आहे.

सराट्याच्या पानांची भाजी

साहित्य
सराट्याची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ किंवा तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा, जिरे, मोहरी, हिंग, तिखट, मीठ इ.

कृती

  • काेवळ्या पानांची भाजी स्वच्छ धुवून, चिरून घ्यावी.
  • कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करून, त्यात डाळ व कांदा परतून घ्यावा.
  • नंतर चिरलेली भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे.
  • तिखट, मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, विकासपिडीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *