नारायणगाव : शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणाऱ्या शिवनेरी कृषी पुरस्कारांचे वितरण नुकतेच नारायणगाव येथे झाले. कृषीरत्न अनिल मेहेर व जेष्ठ संशोधक डॉ. जयराम खिलारी यांना जीवनगौरव तर कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अन्य २३ जणांना शिवनेरी कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत दर वर्षी राज्यात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कृषी व संलग्न पदवीधरांचा कृषी गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे यंदा दोन वर्षांसाठीच्या पुरस्कारांचे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समारंभपूर्वत वितरण करण्यात आले.

कृषीरत्न मेहेर यांनी कृषी विज्ञान केंद्रासह विविध संस्थांच्या उभारणीतून उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी केंद्रीत कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचे बळकटीकरण करण्यात बहुमोल योगदान दिले आहे. तर डॉ. खिलारी यांना द्राक्ष संशोधन, संघटन व शेतकरी सेवेतून शेतकऱ्यांच्या जिवनात यशस्वी अमुलाग्र बदल घडविण्याचे श्रेय जाते. या कामगिरीबद्दल त्यांना कृतज्ञतापुर्वक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय सातारा जिल्हा पोलिस दलात गौरवास्पद कामगिरी करणारे सहाय्यक पोलिस निरिक्षक विशाल वायकल, मुल (चंद्रपूर) येथे उल्लेखनिय कार्य केलेले तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बँकिंग क्षेत्रातील साजिद इनामदार आदी मान्यवरांना शिवनेरी कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिवनेरी कृषी गौरव पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे : विशाल वायकर, डॉ. सुषमा लोखंडे, अनिल चिखले, सिद्धेश ढवळे, विकास दरेकर, अर्चना कोल्हे, सचिन बांबळे, किशोर डेरे, रोहिदास बनकर, संजय फल्ले, साजिद इनामदार, श्रीपाद फल्ले, दिपक झिंजाड, सुशील रायकर, निलेश बेनके, स्नेहल शिंदे, रुपाली पापडे, धनश्री चासकर, सुरज मडके, मच्छिंद्र भालेराव, अनंत पोटे, रामकृष्ण कोल्हे, सतीश गाढवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *