पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मॉन्सूनची संपुर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे. आणखी आठवडाभर पोषक वातावरण होणार नसल्याने त्यानंतर मॉन्सूनचा परतीच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे.
अशी ठरते परतीच्या प्रवासाची वाटचाल…
वायव्य भारतात असलेल्या पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात होते. यासाठी साधारणत: १ सप्टेंबरनंतर त्या परिसरात सतत पाच दिवस पाऊस थांबणे, समुद्रसपाटीपासून साधारणत : ५ ते ८ किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे. तसेच त्या परिसरातील आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी होणे, असे बदल झाल्यास मॉन्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे समजले जाते.
त्यानंतर देशाच्या उर्वरीत भागात मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यासाठी आर्द्रतेत लक्षणीय घट होणे आणि पाच दिवस पाऊस थांबणे हे वातावरणीय बदल विचारात घेतले जातात. तर मॉन्सून संपूर्ण देशातून परतल्याचे जाहीर करण्यासाठी १ ऑक्टोबरनंतर दक्षिण द्वीपकल्पावर वाऱ्यांची बदललेली दिशा विचारात घेतली जाते. नैर्ऋत्य मोसमी वारे देशातून परतल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय झाल्याचे जाहीर केले जाते.
उशीराच होतोय परतीचा प्रवास
गेल्या पाच वर्षांतील मॉन्सूनच्या परतीची वाटचाल पाहता २०१६ मध्ये १५ सप्टेंबर रोजी माघारीस सुरूवात झाली होती. त्यानंतर मात्र मॉन्सूनच्या परतीच्या वाटचाल काहीशी उशीराने होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ पासून मॉन्सून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून माघारी फिरत आहे. २०१९ मध्ये तर १९७५ पासूनच्या नोंदीनुसार सर्वात उशीराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

देशभर दाखल होण्यासही झाला होता विलंब
यंदाच्या आगमनाचा विचार करता नियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशीराने मॉन्सून केरळमध्ये (३ जून) दाखल झाला. केरळात दाखल होताच, मॉन्सून एक्सप्रेसचा प्रवास सुसाट गतीने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत मॉन्सून दोनच दिवसात महाराष्ट्रात (५ जून) पोचला. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच (१० जून) संपुर्ण महाराष्ट्र व्यापला होता.
जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोचणारा मॉन्सून यंदा १७ दिवस आधीच १३ जून रोजी या भागात पोचला. १९ जून रोजी राजधानी दिल्लीसह वायव्य भारत वगळता देशाच्या उर्वरीत भागात मॉन्सूनने दाखल झाला. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने मॉन्सूनचा पुढील प्रवास थांबला. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी वाऱ्यांनी वायव्य भारतात प्रगती केली. सर्वसाधारण वेळेच्या ५ दिवस उशाराने १३ जुलै मॉन्सूनने संपुर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.