विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

पुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. या पावसाने सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. राज्यात अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली असून, १७ ते २३ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक, तर विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह उर्वरीत राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी चांगल्या पावसाने दिलासा मिळाला. बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन), गुजरात आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, त्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा या प्रणाली पूरक ठरल्याने गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला.

९ ते १५ सप्टेंबर या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत ३५४ टक्के अधिक पाऊस पडला. पालघर जिल्ह्यात ३०६ टक्के अधिक, तसेच नंदूरबार जिल्ह्यात २९६ टक्के, ठाणे जिल्ह्यात २७७ टक्के, गोंदिया जिल्ह्यात २५५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने नाशिक, साताऱ्यासह धुळे, नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत २०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोले, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये आठवडाभरात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच उणे ८९ टक्के पाऊस पडला. तसेच बीड जिल्ह्यात उणे ८१ टक्के, जालना उणे ७७ टक्के, उस्मानाबाद उणे ७७ टक्के, औरंगाबाद उणे ३२ टक्के, तर नांदेड जिल्ह्यात उणे २० टक्के पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उणे ४६ तर नगर जिल्ह्यात उणे ३५ टक्के पाऊस पडला. वाशीम, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (१७ ते २३ सप्टेंबर) राज्यातील कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर दुसऱ्या आठवड्यात (२४ ते ३० सप्टेंबर) या काळात राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रात चारही विभागांमध्ये सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाच्या उघडीपीमुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा २८ ते ३४ अंश, तर किमान तापमान २० ते २४ अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *