पुणे : पोषक हवामानामुळे राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारपासून (ता. ६) राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीमध्ये असून, अनुपगड पासून, हिस्सार, दिल्ली, बालंगीर, कलिंगापट्टनम ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पुढील तीन ते चार दिवस तो दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि परिसरावर एक, कच्छ आणि परिसरावर एक आणि वायव्य राजस्थान आणि परिसरावर एक अशी तीन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
कमी दाब क्षेत्रामुळे पाऊस धरणार जोर
बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि पूर्व-मध्य भागात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे सोमवारी (ता.६) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. गुरूवार पर्यंत (ता. ९) राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मराठवाडा, कोकणात दक्षतेचा इशारा
पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारी (ता. ६) अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, मराठवाड्यातील परभणी हिंगोली. नांदेड, लातूर जिल्ह्यात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच नंदूरबार, धुळे, नगर, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा “येलो अलर्ट” हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :
कोकण :
मुंबई शहर : सांताक्रुझ ४६.
रायगड : म्हसळा ५४, पोलादपूर ४७, श्रीवर्धन ७५, तळा ४५.
रत्नागिरी : चिपळूण ८०, दापोली ४३, हर्णे ४३, लांजा ४५, राजापूर ४१, रत्नागिरी ५०.
सिंधुदुर्ग : देवगड ८६, दोडामार्ग ४०, कणकवली ५७, मालवण ७७, वैभववाडी ६३.
ठाणे : कल्याण ७७.
मध्य महाराष्ट्र :
नगर : जामखेड ५६, कर्जत ५२, नेवासा ४०, पाथर्डी ४५.
जळगाव : भाडगाव ४९, भुसावळ ६०, बोधवड ६७, चाळीसगाव ४५, जळगाव १००, जामनेर ४९, यावल ५६.
कोल्हापूर : गगणबावडा ५७.
नाशिक : गिरणा धरण ४५.
सातारा : महाबळेश्वर ५०.
सोलापर : बार्शी ४५, करमाळा ५१, माढा ८३.
मराठवाडा :
औरंगाबाद : औरंगाबाद ४७, खुल्ताबाद ५२, पैठण ५७, सोयगाव ११०.
बीड : अंबाजोगाई ५८, बीड ९६, केज ५५, शिरूर कासार १४८.
हिंगोली : औंढा नागनाथ ५८, हिंगोली ४६, कळमनुरी ५७, सेनगाव ४९.
जालना : आंबड १२०, बदनापूर ४५, घनसांगवी १२४, जाफ्राबाद ४९.
लातूर : औसा ८२, चाकूर ८३, देवणी १०६, जळकोट ४७, लातूर ५४, रेणापूर ११०, शिरूर अनंतपाळ ४८.
उस्मानाबाद : भूम १०४, कळंब ५०, लोहारा ४६, तुळजापूर ४५.
विदर्भ :
गडचिरोली : मुलचेरा ५४.
वाशिम : मंगरूळपीर ५३, मानोरा ४८, रिसोड ४६, वाशिम ४८.