कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती ?

पुणे : राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (ता. ५) राज्यात पाऊस वाढणार असून, तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीमध्ये असून, राजस्थानच्या गंगानगरपासून हिस्सार, गया, कलकत्ता ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. सौराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता.६) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे.

राज्यात ५ स्पटेंबर रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

पावसाला पोषक हवामान होत असल्याने पाऊस वाढणार आहे. उद्या (ता. ५) कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात दक्षतेचा इशारा
राज्याच्या अनेक जिल्ह्यात उद्या (ता. ५) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा असून, काही जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

राज्यात ५ स्पटेंबर रोजी जिल्हानिहाय हवामान इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच पुणे, नगर, नाशिक, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :

कोकण :
मालवण ९०, कुलाबा, पालघर प्रत्येकी ७०, रत्नागिरी, कुडाळ, सांगे प्रत्येकी ४०, दोडामार्ग, हर्णे, खालापूर, मुरूड प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :
मोहोळ, सोलापूर प्रत्येकी ३०, गगणबावडा २०.

मराठवाडा :
बिलोली, हिमायतनगर, माहूर प्रत्येकी ३०, धर्माबाद, नायगाव खैरगाव, सोयगाव प्रत्येकी १०.

विदर्भ :
साकोली ११०, पवनी, वर्धा प्रत्येकी ७०, चंद्रपूर ५०, भामरागड, झारा झामणी प्रत्येकी ४०, आर्वी, भिवापूर, एटापल्ली, कोर्ची, कुही, लाखनी, मारेगाव, सेलू, सिरोंचा प्रत्येकी ३०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: